ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही. पराभूत उमेदवारांनी केलेले आरोप तथ्यहिन आहेत, असे पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. ईव्हीएम मशीनबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत पराभूत उमेदवारांनी आज पुण्यात आंदोलन केले. बॅलेट पेपरद्वारे पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही पराभूत उमेदवारांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पराभूत उमेदवारांनी केलेले आरोप महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी फेटाळले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही घोटाळा झाला नाही. त्यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहिन आहेत, असे कुणाल कुमार यांनी सांगितले आहे. ईव्हीएमबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही योग्य पद्धतीने निवडणुकीचे आयोजन केले होते. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांकडून केला जात आहे. आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. पराभूत उमेदवार नेहमी अशा प्रकारचे आरोप करतात. मतदानाची आकडेवारी ‘फायनल’ करण्याचे काम सुरू आहे. वेबसाईटवरील मतांचे आकडे हे अंतिम नव्हते. केवळ माध्यमांना मतांच्या आकडेवारीची माहिती मिळावी, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीविना ती वेबसाईटवर टाकण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत सर्व आकडेवारी वेबसाईटवर टाकण्यात येईल, असेही आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

तत्पूर्वी, पुण्यात पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली. मशीनमध्ये सेटींग केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पराभूत उमेदवार दत्ता बहिरट यांनी दिली. पुणे महापालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी बालगंधर्व चौक ते वैकुंठ स्मशानभूमीदरम्यान ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली. या मोर्चाला साडेअकरा वाजता सुरुवात करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी संभाजी बागेत मोर्चाचा समारोप केला. त्यापूर्वी त्यांनी रस्त्यावर ईव्हीएम मशीन जाळून निषेध व्यक्त केला. बागेत अनेकांची भाषणे देखील झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक दत्तात्रय बहिरट, रुपाली पाटील तसेच शहरातील विविध भागांतील पराभूत उमेदवार उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत भाजपने मशीनमध्ये सेटिंग केली. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करीत सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून प्रशासनानेही भाजपच्या दबावाखाली कामे केली. ही बाब निषेधार्थ असून लोकशाहीला घातक ठरणारी निवडणूक झाली आहे, असे दत्ता बहिरट म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc election 2017 evm row clarification pmc commissioner kunal kumar
First published on: 28-02-2017 at 18:09 IST