पुणे महापालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण वेगाने पूर्ण केले जात असून अनेकविध सोयींनी सज्ज होणाऱ्या या सभागृहाचा उद्घाटन समारंभ १७ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आयोजित केला जाणार आहे. या कामासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला आहे.
पुणे महापालिकेची स्थापना १५ फेब्रुवारी १९५० रोजी झाली आणि त्यानंतर सध्याच्या मुख्य भवनाचे व त्यातील सभागृहाचे उद्घाटन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९५८ रोजी करण्यात आले होते. या सभागृहाच्या नूतनीकरणाचा प्रारंभ ५ ऑक्टोबर २०१३ रोजी करण्यात आला असून हे काम सध्या वेगाने सुरू आहे. चालू महिन्याची सर्वसाधारण सभा या नव्या सभागृहात होईल. सभागृहाची नवी रचना विधानसभेच्या सभागृहाप्रमाणे होणार असून प्रत्येक सदस्याची जागाही निश्चित होणार आहे. त्यामुळे कोणताही सदस्य सभेत कुठेही बसतो ही सध्याची पद्धत यापुढे राहणार नाही. तसेच उपस्थितीसाठी स्वाक्षरी करण्याची पद्धतही बदलली जाणार आहे. स्वाक्षरी ऐवजी इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे नगरसेवक त्यांची उपस्थिती नोंदवतील.
विधानसभेप्रमाणेच मतदानाची पद्धत नव्या सभागृहात असेल. हे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे असेल व त्याचा निकाल समोरच्या पडद्यावर दिसेल. त्यामुळे हात वर करून मतदान करण्याची सध्याची जी पद्धत आहे, ती देखील यापुढे नव्या सभागृहात पाहायला मिळणार नाही. तसेच ज्या सदस्याचे भाषण सुरू असेल, त्याचे चित्रण सभागृहातील तीन पडद्यांवर दिसणार आहे. महापालिका सभागृहात सध्याच्या रचनेत सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक समोरासमोर बसतात. ही रचना बदलून तीन टप्प्यांमधील अर्ध गोलाकृती बैठक रचना करण्यात येत आहे. सध्या सभागृहातील सदस्यांची संख्या १५७ इतकी असून नव्या रचनेत दोनशेहून अधिक सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था उपलब्ध असेल.
या सभागृहात दोन गॅलरी आहेत. त्यातील एका गॅलरी पत्रकारांसाठी आहे, तर दुसऱ्या गॅलरीत नागरिकांना बसता येते. अनेकदा या गॅलरीतून आंदोलने केली जातात, तसेच घोषणा देत सभागृहात पत्रके फेकली जातात. त्यावर उपाय म्हणून नागरिकांसाठी असलेल्या गॅलरीला जाड पारदर्शक काच बसवण्यात आली आहे. त्यामुळे त्या गॅलरीतील आवाज आता सभागृहात पोहोचणार नाही. सभेतील कामकाज या गॅलरीत बसून फक्त पाहता व ऐकता येईल.
दृष्टिक्षेपात सभागृहाचे नूतनीकरण
- – उद्घाटनासाठी शरद पवार</span>
- – विधानसभेप्रमाणे बैठक व्यवस्था
- – सभागृहात तीन एलसीडी
- – इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धत