पुणे शहराच्या जुन्या हद्दीत जलदगती वाहतुकीसाठी वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याच्या योजनेसाठी महापालिका प्रशासनाने भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली असली, तरी स्थायी समितीला मात्र अद्याप त्याचा पत्ताही नसल्याचे मंगळवारी उघड झाले. या रस्त्यासाठी जागामालकांना रोख रक्कम वा टीडीआर द्यावा, असा ठराव स्थायी समितीत महिनाभर लटकवून ठेवण्यात आला होता आणि मंगळवारी तो परत अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला.
शहरातील वाहतूक व दळणवळण व्यवस्था जलदगतीने, सुरळीत व नियोजनबद्ध होण्यासाठी १९८७ च्या विकास आराखडय़ात महापालिका हद्दीत या वर्तुळाकार मार्गाची आखणी करण्यात आली आहे व आरक्षणही दर्शवण्यात आले आहे. या रस्त्यासाठी आठ लाख ४० हजार चौरस मीटर इतकी जागा संपादित करावी लागेल. आतापर्यंत ५२ हजार ८३९ चौरस मीटर इतकी जागा संपादित करण्यात आली आहे. उर्वरित भूसंपादन वेगाने होण्यासाठी महापालिकेतर्फे मोनार्च सव्र्हेअर्स अॅन्ड इंजिनियरिंग कन्सल्टन्ट्स या कंपनीला काम देण्यात आले असून प्राथमिक सर्वेक्षणाचे बहुतेक कामही कंपनीकडून पूर्ण झाले आहे. तसेच भूसंपादनासाठीचे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. या भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीसाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली असून फक्त प्रशासकीय शुल्क भरण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया अशा पद्धतीने डिसेंबर २०१२ पासून सुरू असून या प्रक्रियेला गती येण्याच्या दृष्टीने जागामालकांना रोख रक्कम वा टीडीआर देण्यास मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी स्थायी समितीला दिला होता. हा प्रस्ताव मंजूर करून प्रशानाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याऐवजी स्थायी समितीने त्यावर निर्णय न घेता तो महिनाभर फक्त पुढे पुढे ढकलला. हा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीपुढे आल्यानंतरही त्याला मंजुरी देण्याऐवजी तो प्रशासनाकडे पाठवण्याचा निर्णय समितीने एकमताने घेतला.
वास्तविक, भूसंपादनाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने अगोदरच सुरू केलेली आहे. तसेच या रस्त्यामुळे शहरातील अन्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचे प्रशासनाने लेखी उत्तरातही स्पष्ट केले आहे. त्यानंतरही पुन्हा या प्रस्तावावर अभिप्राय मागवण्याचे कारण नव्हते. फक्त भूसंपादन प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी पूरक ठरेल असा निर्णय स्थायी समितीने घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रस्तावाबाबत फक्त टोलवाटोलवी करण्याच्या दृष्टीने तो अभिप्रायासाठी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.
वर्तुळाकार मार्ग पस्तीस किलोमीटरचा
खडकी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, कर्वेनगर, दत्तवाडी, पर्वती, बिबवेवाडी, वानवडी, सॅलिसबरी पार्क, हडपसर, मुंढवा, कल्याणीनगर, येरवडा व कळस या भागातून वर्तुळाकार मार्गाची आखणी करण्यात आली असून हा मार्ग ३५ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2013 रोजी प्रकाशित
भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली, तरी म्हणे स्थायी समितीला पत्ताही नाही
पुणे शहराच्या जुन्या हद्दीत जलदगती वाहतुकीसाठी वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याच्या योजनेसाठी महापालिका प्रशासनाने भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली.

First published on: 20-11-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc starts land acquiring for ring road but standing committee didnt know it