पुणे : ‘महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील विविध भागांत रुग्णालये उभारली. ही रुग्णालये तयार झाल्यानंतर चालविण्याची कुवत नसल्याचा साक्षात्कार झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने काही रुग्णालये खासगी संस्थांना, तर काही रुग्णालयांतील विभाग खासगी व्यक्तींना चालविण्यासाठी दिले आहेत.पुणे महापालिकेने शहरातील विविध भागात उभारलेल्या रुग्णालयांची अशी स्थिती असताना तळजाई येथे नव्याने महापालिकेचे रुग्णालय उभारण्याचा घाट आरोग्य विभागाने का घातला आहे,’ अशी विचारणा सजग नागरिक मंचाने केली आहे.
महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा खर्च करून ते चालविण्याची कुवत नसताना उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाला विरोध असल्याचे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले. नागरिकांच्या आकारातून गोळा होणाऱ्या निधीतून हा खर्च केला जातो. त्यामुळे या खर्चाला सजग नागरिक मंचाचा नेहमीच विरोध असेल, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या चालू वर्षाच्या (२०२५-२६) अंदाजपत्रकात तळजाई पठार येथे लहान मुलांचे रुग्णालय उभारण्याचे नियोजित आहे. यासाठी आराखडा तयार करण्याचे पत्र आरोग्य विभागाने नुकतेच भवन विभागाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर वेलणकर यांनी ही विचारणा केली आहे.
वेलणकर म्हणाले, ‘महापालिकेने शहरातील रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल, यांसारख्या मोठ्या रुग्णालयांना अर्धा टक्का अधिक चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिला. या बदल्यात या रुग्णालयांमध्ये दररोज काही खाटा महापालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, त्यातील पाच टक्के जागाही महापालिका वापरू शकत नाही. हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कार्यक्षम कारभार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन तळजाई येथे ३०० खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची तसेच इतर रुग्णालये उपलब्ध असतानादेखील हा घाट कोणासाठी घातला जात आहे,’ अशी विचारणा वेलणकर यांनी केली आहे. रुग्णालय उभारून झाल्यावर खासगी संस्थेच्या हवाली करण्याचा डाव या मागे असू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभाागाच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नेमावी. समितीच्या मान्यतेशिवाय कोणतीही भांडवली गुंतवणूक करू नये. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन महापालिकेचे नुकसान टाळावे. विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच