प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालकासह वाहकावर गुन्हा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमपी बसचा ब्रेक अचानक दाबल्यानंतर आसनावरून पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला जखमी अवस्थेत रस्त्याला सोडून देण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमी प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. चऱ्होली भागात   गेल्या सोमवारी (२६ डिसेंबर) ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पीएमपी बसचालक आणि वाहकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

[jwplayer itkTOSml]

ज्ञानेश्वर रघुनाथ अभंग (वय ५७, रा.चऱ्होली, आळंदी रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रक रणी पीएमपी बसचालक राजकुमार श्रीधर चौधरी (वय ४५, रा. काळेवाडी, पवनानगर) आणि वाहक काळुराम गंगाराम काळजे (वय ४९, रा. काळजेवाडी, चऱ्होली, आळंदी रस्ता) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. घाटगे यांनी या संदर्भात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (२६ डिसेंबर) अभंग कामानिमित्त भोसरी येथे आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास भोसरीतून ते पीएमपी बसने चऱ्होलीला निघाले होते. प्रवासादरम्यान, चालक चौधरी याने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर अभंग आसानावरून खाली पडले. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर चालक चौधरी आणि वाहक काळजेने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे गरजेचे होते. मात्र, खेडकर वीटभट्टीनजीक असलेल्या ताजणेमळा येथे जखमी अवस्थेतील अभंग यांना रस्त्याच्या कडेला सोडून चालक आणि वाहक पसार झाले. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही. दरम्यान, रस्त्याच्या कडेला पडलेल्या अभंग यांना नागरिकांनी पाहिले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पीएमपी चालक आणि वाहकाच्या निष्काळजीपणामुळे अभंग यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आहेर तपास करत आहेत.

पंधरवडय़ातील दुसरी घटना

नळस्टॉप चौकात पंधरा दिवसांपूर्वी एका मोटारचालकाने पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली होती. नागरिक जमा झाल्यानंतर मोटारचालकाने ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल करतो, अशी बतावणी केली होती. त्यानंतर जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकाला कोंढवा भागात सोडून मोटारचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप मोटारचालकाचा ठावठिकाणा लागलेला नाही.

[jwplayer CJ5r9OHQ]

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmp bus driver escape after hitting senior citizen
First published on: 02-01-2017 at 04:31 IST