पुणे : स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नादुरुस्त आणि आयुर्मान संपलेल्या बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या ४६ नादुरुस्त बस मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या बसच्या सुट्या भागांंची लिलावातून विक्री करण्यात येणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात ४६ जुन्या बस आहेत. या बस मोडीत काढण्याचा यापूर्वीच निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बस मोडीत काढल्यानंतर सुट्या भागांच्या विक्रीत अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे आता या बसच्या सुट्या भागांचा लिलाव केला जाणार आहे. त्यातून उत्पन्न मिळण्याचे पीएमपी प्रशासनाने नियोजन केले आहे.

दीड कोटी रुपये मिळण्याचा अंदाज

नादुरुस्त आणि मोडकळीत पडलेल्या बसचे टायर, पत्रे, ट्यूब, लोखंड, वापरलेले वंगण आणि इतर सुट्या भागांना मागणी असते. लिलावाद्वारे विक्रीतून प्रत्येक बसच्या माध्यमातून अडीच ते तीन लाख रुपये मिळण्याचा अंदाज पीएमपी प्रशासनाने वर्तविला आहे. लिलावातून सुमारे दीड कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या १००४ बस आहेत. त्यापैकी ३२७ बसचे आयुर्मान येत्या वर्षभरात संपुष्टात येणार आहे. ४६ बस नादुरुस्त आहेत. या बस मोडीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बसच्या सुट्या भागांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. त्यातून पीएमपीला आर्थिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे स्थानकात बस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. – नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल