पिंपरी : जादा भाडे आकारणे, मान्यता व क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या २५१ खासगी बस, वाहनांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) भरारी पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड आगारातून विविध मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अनेकांनी खासगी प्रवासी बसचा पर्याय निवडला. मात्र, या गोष्टीचा गैरफायदा घेत बस कंपन्यांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. ही बाब निदर्शनास येताच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग, तसेच भरारी पथकाकडून विविध वाहनांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये जादा भाडे आकारणे, मान्यता व क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, वाहनरचनेत बदल करणे, वाहनाची योग्य कागदपत्रे न बाळगणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाची स्थानके, प्रमुख महामार्गांवर या पथकांकडून तपासणी करण्यात आली. दोषी २२९ वाहनांवर, तसेच जादा भाडे आकारणाऱ्या २२ अशा २५१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ४७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी वाहतूकदारांनी एसटी भाडे दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यावर कारवाईचा इशारा दिला होता. भरारी पथकांकडून करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.