पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रासह (एमआयडीसी) परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात पहाटे चाकणचा दौरा केला होता. यानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून (दि. १०) नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी प्रशासकीय यंत्रणेने स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसीसह शहर परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर चाकण- तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे ४० अतिक्रमणे काढण्यात आली. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा आशयाच्या नोटीसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे.

या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे- नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेबावीस मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सह कार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा चर्चेत आला. वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांच्या अभावामुळे चाकणमधील उद्योग अडचणीत आले आहेत. अखेर याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांची झाडाझडती घेऊन उद्योगांची कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले. यानंतर ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्र्यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रांची झाडझडती घेतली होती. विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यावेळी त्यांनी दिले होते.