‘वाहतुकीचा स्वस्त आणि प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून जैवइंधनाचा विचार करणे आवश्यक आहे. पुण्यातील बसेस येत्या काळात इथेनॉल किंवा जैवइंधनावर चालवण्याचे विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे विजेवर चालणारी बस सेवाही देशात लवकरच सुरू करण्यात येणार आहे,’ असे सार्वजनिक वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी बांग्लादेशचे परदेश व्यवहार राज्यमंत्री शहरीर आलम, नेपाळचे अर्थमंत्री रामशरण मोहाता, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव अनील वधवा, भारताचे माजी राजदूत सुधीर देवरे, सिम्बॉयसिसचे कुलपती डॉ. शां, ब, मुजुमदार, प्रधान सचिव डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या संचालिका शिवाली लवळे हे उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, ‘येत्या काळात जगातील सर्वच देशांना वाहतुकीसाठी स्वस्तातील आणि प्रदूषणाला आळा घालणारे विविध पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पुण्यात इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे पुण्यात इथेनॉलवर चालणारी बस सेवा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. देशांतर्गत जलवाहतूक हा वाहतुकीचा स्वस्त पर्याय आहे. त्यामुळे अधिकाधिक भाग जोडला जाऊ शकतो. मोठय़ा सामानवाहू नौकाही प्रवास करू शकतील अशा देशातील १२ ठिकाणांचा वाहतुकीच्यादृष्टीने विचार करण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून मालवाहतुकीचा खर्च कमी होऊ शकतो. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचा आधार (पीपीपी) घेऊन हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वाहतूक क्षेत्रात शंभर टक्के परदेशी गुंतवणूक करण्यालाही शासनाने मंजुरी दिली आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शेजारील देशांशी असलेले दळणवळण वाढवण्यासाठीही जलवाहतुकीचा पर्याय योग्य आहे. शेजारील देशांना जोडणाऱ्या जलमार्गाचा आणि रस्त्यांचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2014 रोजी प्रकाशित
पुण्यात इथेनॉलवरील बसेस धावणार – नितीन गडकरी यांची घोषणा
पुण्यातील बसेस येत्या काळात इथेनॉल किंवा जैवइंधनावर चालवण्याचे विचाराधीन आहे,’ असे सार्वजनिक वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.

First published on: 14-12-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmt on ethanol