पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून तोडफोड करणारा गुंड ऋषीकेश उर्फ बारक्या संजय लोंढे याच्याविरुद्ध पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत दहशत असलेला ऋषीकेश लोंढे (वय २२) याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. मकोका कारवाई केल्यानंतर त्याने न्यायालयाकडून जामीन मिळविला. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आलेल्या लोंढेने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली. १७ जुलै रोजी लोंढेने पाठलाग करून एका तरुणीचा विनयभंग केला होता. तसेच तिच्या काकाला धमकाविले होते. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बारक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोंढेने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तरुणी एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्या वेळी लोंढेने तिला रस्त्यात अडविले. तरुणीने तिच्या काकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लोंढेने ब्युटीपार्लर चालक महिलेला ब्युटीपार्लरची तोडफोड करण्याची धमकी दिली होती. काकासोबत घरी जात असताना त्याने तरुणीसह तिच्या काकाला धमकाविल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांचे पथक लाेंढेला ताब्यात घेण्यासाठी तळजाई वसाहतीत गेले. त्या वेळी त्याने पोलिसांच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडून पहाटे पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यातील काचेवर बेडी आपटली. बेडी आपटल्यानंतर त्याच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांच्या अंगावर धावून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी लोंढे आणि त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ मोन्या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय तपासणीसाठी दोघांना ससून रुग्णालायत आणले होते. तेव्हा त्याचा भाऊ पोलिसांची नजर चुकवून पसार झाला. त्याला पर्वती दर्शन परिसरातून रात्री ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याप्रकरणी मोन्या याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.