पिंपरी : चिंचवड शहरातील आयटी हब हिंजवडी आणि उच्चभ्रू असलेल्या वाकड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या चालक, मालकांवर गुन्हा दाखल करत आठ महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आल आहे. यावर्षी आत्तापर्यंत पिटा अंतर्गत ३१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३२ पीडित महिलांची सुटका केल्याची कामगिरी केली आहे. तर, ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्पा च्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. पैशांचं आमिष दाखवून महिलांना स्पा सेंटरमध्ये कामाला लावलं जातं. मग त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो. अशी माहिती वारंवार समोर आलेली आहे.

हेही वाचा…ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली

पिंपरी- चिंचवड शहरातील हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन स्पावर धाड टाकून पोलिसांनी आठ महिलांची सुटका करत सहा स्पा चालक आणि मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडीत ब्रेथ स्पा आणि वाकडमध्ये द गोल्ड थाई स्पा, द राईस स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून आठ महिलांची सुटका केली आहे.