scorecardresearch

पुणे: कसबा, चिंचवड मतदारसंघासाठी मतदान केंद्रे निश्चित

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

election
कसबा, चिंचवड मतदारसंघासाठी मतदान केंद्रे निश्चित

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू असून या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये अनुक्रमे २७० आणि ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>“कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी”; चंद्रशेखर बावनकुळेंची सर्वपक्षीयांना विनंती

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदार संघात तीन लाख एक हजार ६४८ पुरुष, दोन लाख ६४ हजार ७३२ महिला आणि ३५ तृतीयपंथी असे एकूण पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ने वाढ झाली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एक लाख ३६ हजार ८७३ पुरुष, एक लाख ३८ हजार ५५० महिला आणि पाच तृतीयपंथी असे एकूण दोन लाख ७५ हजार ४२८ मतदार आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत १५ हजार २५५ ने घट झाली आहे.

हेही वाचा >>>भाजपप्रमाणेच महाविकास आघाडीने पुणे – पिंपरीत उमदेपणा दाखवावा; राज ठाकरे यांचे आवाहन

अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे कसबा विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 13:50 IST