सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात संशोधनपर अभ्यास

पुणे : दररोज छोटय़ा स्वरूपाचे व्यायाम (अ‍ॅक्टिव्हिटी) प्रकार केल्यास ज्येष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागाने के लेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या अंतर्गत विविध सामाजिक, आर्थिक घटकांतील सुमारे आठशे ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास करण्यात आला असून, छोटय़ा व्यायामांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याचा वेग वाढत असल्याचे, त्यांचे परावलंबित्व कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात गेल्या आठ वर्षांपासून वयस्कांसंदर्भातील अभ्यास करण्यात येत आहे. त्यात स्नेहल कु लकर्णी या विद्यार्थिनीने विभागप्रमुख डॉ. आरती नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांचे तोल जाऊन पडण्याचे प्रमाण आणि त्यावरील उपायांचा अभ्यास केला. या बाबतचा शोधनिबंध ‘गेट अँड पोश्चर’ या संशोधनपत्रिके त प्रसिद्ध झाला आहे. तसेच ‘जेरिएटिक सोसायटी ऑफ अमेरिका’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे.

सेन्सर असणाऱ्या उपकरणांचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ज्येष्ठांचा चालण्याचा वेग, उठण्या-बसण्याची क्षमता आदींचा अभ्यास करत त्यांचे पडण्याच्या शक्यतेचे प्रमाणही मोजण्यात आले. तसेच पडण्यापासून बचाव करण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकांना काही छोटे व्यायाम (अ‍ॅक्टिव्हिटी), घरात छोटे बदल करण्यास सांगितले गेले. त्यामुळे अनेक ज्येष्ठांचा चालण्याचा वेग वाढला, परावलंबित्व कमी झाले, पडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले, असे स्नेहल कु लकर्णीने सांगितले.

डॉ. आरती नगरकर म्हणाल्या, साधारण दीड ते दोन वर्षांपासून पुण्याच्या विविध भागांतील, विविध आर्थिक, सामाजिक गटातील आठशे ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास करण्यात आला. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याचे प्रमाण (फॉल रेटिंग) अधिक आहे. निष्क्रियता वाढल्याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम ज्येष्ठांवर होऊन त्यांचे अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढते. त्यातूनच अनेकदा चालण्याचा आत्मविश्वास गमावला जाऊन तोल जाऊन पडण्याचे प्रमाण वाढते.

पडण्यापासून बचावासाठीचे उपाय

’  घरात काही ठिकाणी छोटे बदल करणे. उदाहरणार्थ – पायऱ्यांवर रेडियम लावणे, हँडल बसवणे

’  दररोज छोटे व्यायाम करणे

’  पडण्याची भीती कमी करण्यासाठी मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

आरोग्यशास्त्र विभागाच्या संशोधनपर अभ्यासाचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होऊ शके ल. विद्यापीठात अशा समाजोपयोगी संशोधनाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ