सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या दोन विभागांचे विलीनीकरण करून डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज, असा नवीन विभाग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन विभागांच्या विलीनीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी मोठा विरोध केला. यासाठी सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट नावाची मोहीम देखील चालवली जात आहे. दरम्यान रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग स्थलांतराच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत पुणे विद्यापीठाने पत्रक जारी केले आहे.

रानडे इन्स्टिट्यूट शंभर वर्षांपेक्षा जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीमधून सुरू आहे. इथे १९६४ मध्ये  पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्राच्या नवोदित पत्रकारांसाठी ग्रामीण भागातील हुशार आणि पत्रकारितेत काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संस्था मार्गदर्शक आहे. या संस्थेने आतापर्यंत अनेक प्रख्यात पत्रकार घडवले आहेत. रानडे इन्स्टिट्यूट मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिकताना नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोईचे आहे. तसेच या ठिकाणी विद्यार्थी, पत्रकार, संपादक यांचा नियमितपणे संपर्क येतो त्यामुळे विद्यार्थांना मार्गदर्शन मिळते.

विद्यापीठाची भूमिका

रानडे इन्स्टिट्यूटची इमारत विद्यापीठाने पोटभाडे करारावर घेतली आहे. त्याची मालकी विद्यापीठाकडे नाही. भाडे कराराची बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे. तसेच या जागेची विक्रीची चर्चा वस्तुस्थितीस धरुन नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

पत्रकारीता विभागास सध्या उपलब्ध जागा मर्यादीत असल्याने तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे बांधकाम व दुरुस्ती मर्यादा असल्यामुळे भौतिक सोयी-सुविधांचा प्रश्न नेहमी विद्यापीठ अधिकार मंडळापुढे मांडण्यात आला. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांना रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी विद्यापीठातून ये-जा करावी लागते. या अडचीणी लक्षात घेता विद्यापीठाने विभाग स्थलांतराचा निर्णय घेतला होता, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काल गुरवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विद्यापीठाच्या कुलगुरुंची बैठक झाली. यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवेदनानुसार  रानडे इन्स्टिट्यूट मधील पत्रकारिता विभाग तसेच अभ्याक्रमाचे एकत्रीकरण अथवा स्थलांतरास स्थगीती देल्याचे विद्यापीठाने जाहीर केले.