पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची पुन्हा चाळणी झाली असून शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, शहरात केवळ ३९२ खड्डे असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागांतील रस्त्यावर माेठमाेठे खड्डे दिसून येत आहेत. शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार ७२ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. मे महिन्यापासून आतापर्यंत तीन हजार ६१५ खड्डे पडले आहेत. त्यांपैकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने एक हजार ४४९, बीबीएमने २४७, खडीने ९८१, पेव्हिंग ब्लॉकने २७२, सिमेंट काँक्रिटने ४३२ असे तीन हजार ३८१ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ८०.२१ टक्के आहे.

शहरातील केवळ ३९२ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येतात. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत आहेत. गणेशाेत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचा महापालिकेचा दावा फाेल ठरला आहे. दरम्यान, खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतूक संथ गतीने होत असून कोंडीत भर पडत आहे.

शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सध्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी रिपाइं (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केली.

शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या आहेत. लवकरच सर्व खड्डे बुजविले जातील, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.