वसाहतीचे स्थलांतर रखडल्याचा परिणाम; रस्ता तयार, पण अतिक्रमणाचा अडसर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पौड फाटा चौकातील उड्डाण पूल उतरल्यानंतर लगेचच डाव्या हाताकडे जाणाऱ्या शीलाविहार कॉलनीलगतच्या बैठय़ा वसाहतीच्या अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रखडलेला आहे. महापालिकेने पर्यायी जागा देऊनही या वसाहतीचे स्थलांतर झाले नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने तेथील अतिक्रमण हटविल्यास शीलाविहार कॉलनी ते मयूर कॉलनीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस खुला होईल आणि पौड रस्त्यावरील ताण कमी होईल, असे पत्र वाहतूक पोलिसांकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.

पौड रस्त्यावर गेल्या आठ महिन्यांपासून मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रस्तावित मेट्रोमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसांत मेट्रोचे खांब उभारण्याचे काम पौड फाटा चौकात येईल. तेव्हा या भागातील वाहतुकीवर परिणाम होईल. पौड रस्त्यावर मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक संथगतीने सुरू असते. पौड फाटा उड्डाणपूल उतरल्यानंतर डाव्या हाताला शीलाविहार कॉलनी आहे. शीलाविहार कॉलनीच्या शेवटच्या टोकाला भीमनगर वसाहत आहे. शीलाविहार कॉलनी ते मयूर कॉलनीपर्यंतचा अंतर्गत रस्ता महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. मात्र, भीमनगर वसाहतीचे स्थलांतर न झाल्याने रस्ता तयार असूनही तो वाहनचालकांना खुला करून देता येत नाही. या वसाहतीचे स्थलांतर तातडीने करण्यात यावे, असे पत्र वाहतूक पोलिसांकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आले, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.

कोथरूड वाहतूक विभागाअंतर्गत मेट्रो मार्गाचे काम नळस्टॉप चौक, पौड रस्ता, कोथरूड डेपोपर्यंत सुरू आहे. त्यामुळे पौड रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची मोठय़ा प्रमाणावर कोंडी होती. पावसाळा सुरू झाल्यानंतर पौड रस्त्यावरील कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. पौड फाटा येथील शीलाविहार कॉलनीतील रस्ता, भीमनगरमधून मयूर कॉलनी, शेलार कॉलनी, गुजरात कॉलनीपर्यंत जोडण्यात आला आहे. भीमनगर वसाहतीचे स्थलांतर न झाल्यामुळे पर्यायी मार्ग तयार असूनही तो खुला होऊ शकत नाही. अतिक्रमण हटविल्यास पौड फाटा चौकातून उड्डाण पुलावरून येणारी वाहतूक वळविण्यात येईल. तीनचाकी, दुचाकी वाहने या रस्त्याने गेल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल आणि पौड रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे होईल, असे पत्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांना नुकतेच देण्यात आले आहे, असे वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी नमूद केले.

पर्यायी जागा उपलब्ध पण नगरसेवकांचा काणाडोळा

भीमनगर वसाहतीत चाळीस ते पन्नास झोपडय़ा आहेत. गेल्या काही वर्षांपासून झोपडय़ांचे स्थलांतर होण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. महापालिकेकडून झोपडपट्टीतील रहिवाशांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. पण स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाकडून वसाहतीतील रहिवाशांचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्यास फारसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप या भागातील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.

पर्यायी मार्गामुळे मेट्रोचे काम जलदगतीने

शीलाविहार कॉलनीतील रस्ता तयार आहे. हा रस्ता काँक्रीटचा आहे. पण भीमनगर वसाहतीतील झोपडय़ांमुळे हा रस्ता खुला करता येत नाही. उड्डाण पुलावरून उतरल्यास शीलाविहार कॉलनीच्या रस्त्याने थेट मयूर कॉलनी, शेलार वस्ती, गुजरात कॉलनीत जाता येईल. त्यामुळे पौड रस्त्यावरील कोंडी कमी होऊन मेट्रोचे काम जलदगतीने सुरू होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pound road traffic issue
First published on: 14-06-2018 at 02:16 IST