पिंपरी: राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातच येणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केला. कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील, असे गृहीत धरून आतापासूनच कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित काळेवाडीतील मेळाव्यात गव्हाणे बोलत होते. भाऊसाहेब भोईर, नाना काटे, राहूल भोसले, प्रशांत शितोळे, शाम लांडे, पंकज भालेकर, विनोद नढे, अरुण बोऱ्हाडे, कविता आल्हाट आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

गव्हाणे म्हणाले, गेल्या पाच वर्षांतील पालिकेच्या कारभारात भाजप पदाधिकाऱ्यांनी लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठला. त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराचा विकास खुंटला आहे. राष्ट्रवादीने १५ वर्षात शहराचा कायापालट केला. भाजपने मात्र पाच वर्षात केलेला प्रचंड भ्रष्टाचार केला, दोन्ही पक्षाच्या कारभारातीलल फरक जनतेच्या दरबारात प्रभावीपणे मांडावा लागणार आहे. शंभराहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दीष्ट साध्य करायचे असून पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावयाचा आहे, असा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचे मेळाव्यात अभिनंदन करण्यात आले. येत्या २२ जुलैला अजितदादांचा वाढदिवस असून विविध सामाजिक उपक्रमांनी तो साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक रणसुभे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले. विनोद नढे यांनी आभार मानले.