गरोदरपणात मृत्यू पावणाऱ्या मातांच्या संख्येत शहरात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी २६ ते ३५ या वयोगटात झालेल्या मातामृत्यूंची संख्या या वर्षी लक्षणीयरीत्या कमी झालेली दिसून येत आहे. पालिकेच्या ताज्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत शहरात एकूण ६४ मातांचा गरोदरपणात मृत्यू झाला होता. यातील २० माता पुण्यातील होत्या, तर इतर बाहेरून उपचारांसाठी आलेल्या होत्या. या वर्षी डिसेंबरअखेर शहरातील मातामृत्यूंची संख्या ३८ वर आली आहे. यातील १० माता पुण्यातील आहेत.
गेल्या वर्षी नोंद झालेल्या मातामृत्यूंमधील ३० मृत्यू केवळ गरोदरपणातील उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर गुंतागुंतींमुळे (इक्लॅम्पशिया) झाले होते. तर या वर्षी या दोन कारणांमुळे ६ मातामृत्यूंची नोंद झाली आहे. याशिवाय रक्तस्त्राव (हेमरेज), हृदयविकार, रक्तक्षय आणि रक्तवाहिन्यांचे आजार ही मातामृत्यूंची प्रमुख कारणे ठरली असून त्याखालोखाल जंतूदोष (सेप्सिस) हेदेखील मातामृत्यूचे एक कारण दिसून आले.गरोदरपणात मृत्यू पावणाऱ्या बहुसंख्य माता १९ ते २५ या वयोगटातील आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता २६ ते ३५ या वयोगटातील मातामृत्यूंचे प्रमाण २४ वरून ८ असे कमी झालेले दिसून येत आहे.
पालिकेच्या उप आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या,‘‘गरोदरपणात उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या मातांनी वेळीच रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. तसेच ज्या मातांना गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते अशा मातांनी शक्यतो ससूनसारख्या मोठय़ा टर्शरी केअर रुग्णालयात दाखल होणे गरजेचे ठरते. क्लिनिक्स व लहान रुग्णालयांनी गरोदर स्त्रीला मोठय़ा रुग्णालयात पाठवताना तिला अँब्युलन्समधूनच पाठवायला हवे, तिच्याबरोबर एक नर्सही असायला हवी. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरोदरपणातील देखभाल, प्रसूती आणि त्यानंतरचा दीड महिना मातेची वैद्यकीय तपासणी, चाचण्या आणि औषधोपचारांची सुविधा मोफत उपलब्ध आहे.’’
   

वर्ष (एप्रिल ते मार्च)    मातामृत्यू            वयोगट
                                  १९ ते २५ वर्षे           २६ ते ३५ वर्षे
   
२०१२-१३            ६४        ३९            २४        
२०१३-१४            ३८        ३०            ८

मातामृत्यू टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

– लग्नानंतर लगेच मूल नको.
– दोन मुलांत किमान दोन वर्षांचे अंतर असावे.
– गरोदरपणात लवकरात लवकर रुग्णालयात नाव नोंदवावे.
– प्रसूतीच्या दिलेल्या तारखेनुसार गरोदर स्त्रीने रुग्णालयात जाण्यासाठी स्वत:ची तयारी करून ठेवावी. (बर्थ प्रीपेअर्डनेस)
– लहान रुग्णालयातून आयत्या वेळी मोठय़ा रुग्णालयात हलवावे लागले तर त्याचे नियोजन आधीच केलेले हवे.