पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी नगरसेवकांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या वेळी होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर बदलासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळी नऊ वाजता सांगवी फाटा येथील ‘सब-वे’ चे उद्घाटन होणार असून साडेनऊ वाजता पिंपळे सौदागर येथे नाशिकफाटा ते वाकड या बीआरटी मार्गाचे उद्घाटन होणार आहे. साडेदहा वाजता चिंचवडच्या चापेकर चौकात सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. सकाळी पावणेअकरा वाजता चिंचवड येथील कृष्णाजी चिंचवडे पाटील शैक्षणिक संकुल, तसेच अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे. बैठकीत शरद पवार यांच्या गौरवार्थ आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, पिंपरीच्या महापौर व उपमहापौरांची मुदत संपली असल्याने या विषयावरील निर्णायक चर्चाही अपेक्षित आहे.