पुणे : कर्मचाऱ्यांनी १४ ते २० मार्च या कालावधीत केलेल्या संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी (२५ आणि २६ मार्च) कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या. आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये मंजूर तरतूद, पूरक मागणीपत्राद्वारे मंजूर तरतूद आणि सुधारित अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेली तरतूद १०० टक्के उपलब्ध होणार आहे.
आर्थिक वर्ष संपण्यास खूपच कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या तरतुदी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी १०० टक्के खर्च करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे ६ फेब्रुवारीच्या शासनाच्या निर्णयानुसार नियमानुसार पात्र ठरणाऱ्या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची कार्यवाही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या १४ ते २० मार्च या कालावधीतील संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दिलेल्या निधीचा वापर ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक असल्याने सर्व प्रकारची देयके मंजूर करून अनुदानाची रक्कम जमा करणे, वेतन जमा करण्यासाठी आवश्यक ती कामे आणि आर्थिक वर्षाअखेरची कामे पूर्ण करण्यासाठी २५ आणि २६ मार्चला कार्यालय सुरू ठेवून दिलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.