scorecardresearch

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, आकस्मिक प्रसंगी अर्ध्या तासात उपचार

नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. या निधीतून या केंद्रांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, आकस्मिक प्रसंगी अर्ध्या तासात उपचार
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अत्याधुनिक सुविधांनी सज्ज (प्रातिनिधिक छायाचित्र) (आभार : निरगुडसर ग्रा.पं. )

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी तब्बल २२ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. या निधीतून या केंद्रांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांत १०१ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर उपकेंद्रांची संख्या ५४६ आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची संख्या २८ असून आयुर्वेदिक दवाखान्यांची संख्या १३ आहे. ११ आरोग्य पथके असून फिरत्या दवाखान्यांची संख्या तीन आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २१ कोटी ५४ लाख ९१ हजार ७१ रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. हा निधी प्राप्त झाला असून त्यातून कामेही सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : ‘कुमार कोश’चे दोन खंड सहा महिन्यांत वाचकांच्या हाती

साहित्य व साधनसामग्रीच्या उपलब्धतेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २८ प्रकारच्या विनामुल्य वैद्यकीय सेवा प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. आकस्मिक प्रसंगी पहिल्या अर्ध्या तासाच्या आत प्राथमिक निदान व उपचार करता येणार आहेत. रुग्णाचे वेळेत निदान करून प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. साहित्य व साधनसामग्री उपलब्ध झाल्याने या केंद्रांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया वगळता इतरही शस्त्रक्रिया करता येणार आहेत. प्रयोगशाळेत साहित्य, साधनसामग्री उपलब्ध झाल्याने २६ ऐवजी ३२ प्रकारच्या तपासण्या या केंद्रांत विनामुल्य करता येतील. रक्तदाब, मधुमेह, यकृत, मूत्रपिंड विकार, गरोदर माता व बालकांचे आजार निदान व उपचार करता येणार आहेत. प्राप्त साहित्य, साधनसामग्रीमुळे विशेषज्ञ यांच्या सेवा या केंद्रात विनामुल्य उपलब्ध होणार आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

दरम्यान, फर्निचरसाठी १३ कोटी ७९ लाख १९ हजार ७४०, साहित्य व साधनसामग्रीसाठी चार कोटी ८५ लाख ९७ हजार ३३१ रुपये, तर इतर किरकोळ दुरुस्तीसाठी दोन कोटी ८९ लाख ७४ हजार रुपये आवश्यक होते. कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व निधी (सीएसआर) १३ कोटी ३६ लाख रुपये, जिल्हा परिषद स्वनिधी सव्वाचार कोटी रुपये, तर जिल्हा नियोजन समितीकडून ४.८९ कोटी रुपये, असा एकूण २२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा – पुण्यातील पुरातन वाडे, गढ्या, मंदिरांचे होणार सर्वेक्षण, वास्तूंचे संवर्धन, पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट

बक्षीस योजना

आरोग्य विषयक सुधारणा, उपक्रमांमुळे जिल्ह्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पुरस्कार योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतर्गत १०१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५४९ उपकेंद्रांमधून दरवर्षी तालुकास्तरावरून एक प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन उपकेंद्रांची निवड करण्यात येणार आहे. यापैकी जिल्हास्तरावर उत्कृष्ट तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व एका उपकेंद्राची निवड करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 10:52 IST

संबंधित बातम्या