स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (६ डिसेंबर) पुण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अतिमहत्त्वाच्या परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ठाकरे एकत्र येणार असले तरी राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणांच्या पाश्र्वभूमीवर ही भेट चर्चेची ठरली आहे.
देशभरातील पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय परिषद पुण्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी (६, ७, ८ डिसेंबर) होणार आहे. पाषाण रस्त्यावरील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) येथे ही तीन दिवसांची परिषद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. राजशिष्टाचारानुसार मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. पुणे विमानतळावर मोदी यांचे सकाळी नऊ वाजून ५० मिनिटांनी आगमन होणार असून त्यांचे स्वागत केल्यानंतर ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत.
या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख वाय. के. जेठवा यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. या परिषदेत देशातील अंतर्गत सुरक्षेवर चर्चा होणार असून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह १८० हून अधिक वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस शहरात मुक्कामाला आहेत.