पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वरूपातील बक्षीस योजना सुरू केल्यानंतर पालिकेने आता खासगी शाळांमधीलही गुणवंतांचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीत ८५ ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १० ते १५ हजार रूपये दिले जाणार आहेत. या एकूण योजनेसाठी तब्बल नऊ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नागरी विकास योजना विभागाच्या वतीने शहरातील खासगी मान्यताप्राप्त विद्यालयातील दहावीत ८५ ते ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार आणि ९० पेक्षा जास्त टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपये दिले जाणार आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षांकरिता योजनेचा लाभ घेण्यासाठी पालिकेने खासगी शाळांना आवाहन केले होते. त्यानुसार, ३१५ अर्ज दाखल झाले. तथापि, आणखी २२५२ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यांचे अर्ज अद्याप जमा झालेले नाहीत. या योजनेची व्याप्ती लक्षात घेता नऊ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली. पात्र ठरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी १४ ऑगस्ट अखेर नागरी सुविधा केंद्रात अर्ज जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.