ससून सवरेपचार रुग्णालयात स्वच्छता अभियान सुरू झाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी रुग्णालयातील स्वच्छतेशी निगडित मूळ समस्या मात्र ‘जैसे थे’च आहेत. रुग्णालयाच्या इमारतींमधील फुटलेल्या पाईपलाईन्समधून सतत वाहणारे पाणी ही ससूनची प्रमुख समस्या बनली आहे. पाईपमधून पडणारे हे पाणी इमारतींच्या खाली साचून राहात असल्याने सध्याच्या हवामानात या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत (इमारत क्र. ‘अ’) गळक्या पाईपलाईन्सचा त्रास मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो आहे. या इमारतीतील ‘क्ष- किरण’ कक्षाच्या मागील बाजूच्या पाईपलाईन पूर्णत: गंजून फुटल्या आहेत. या पाईप्समधून सातत्याने पाणी वाहात असून येथे मोठय़ा प्रमाणावर कचराही साचला आहे. सध्या इमारतीतील ८, १० आणि १२ क्रमांकाच्या वॉर्डचे नूतनीकरण सुरू आहे. या नूतनीकरणासाठी आणलेल्या सिमेंटची रिकामी पोती, फुटलेल्या काचा असा कचरा ‘क्ष- किरण’ कक्षाच्या मागील बाजूस साठून राहिला आहे. या ठिकाणी दरुगधीही सुटली आहे.
मुख्य इमारतीतील सर्व चौकांमध्ये पाईपलाईन्स फुटल्या असून या चौकांची अवस्था दयनीय आहे. ‘सीटी स्कॅन’ विभागात सुरू असलेल्या बांधकामाशेजारील मोकळ्या जागेत, तसेच प्रादेशिक रक्त संक्रमण केंद्राजवळील मोकळ्या चौकातही पाईप्समधून पाण्याची संततधार लागली आहे.
‘ट्रॉमा आयसीयू’ विभागासमोरही हीच परिस्थिती दिसून येत आहे. या विभागासमोरच्या मोकळ्या जागेत गार हवा येण्यासाठी सहा कूलर ठेवले आहेत. यातील दोनच कूलर सुरू ठेवले जात असून त्यातूनही पाणी ठिबकते. गळक्या कूलर्समुळे या अतिदक्षता विभागाशेजारच्या चौकात पाण्याचे थारोळेच साचलेले दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन पाईप टाकेपर्यंत समस्या राहणारच- अधीक्षक
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले,‘‘ससूनची इमारत ७० ते ८० वर्षे जुनी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे पाईप गंजून निकामी झाले आहेत. एका ठिकाणचा पाईप दुरूस्त करेपर्यंत दुसरीकडचा पाईप फुटलेला असतो. त्यामुळे पाईप दुरूस्तीच्या कामात अडचणी आहेत. सर्व पाईप नवीन टाकले जात नाहीत तोपर्यंत ही समस्या राहणारच. सध्या काही वॉर्डचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे तिथल्या पाईपलाईन बदलल्या जातील. इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने नवीन पाईपलाईन बसवण्याचा प्रस्ताव बांधकाम खात्याला दिला आहे.’’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems in sasoon
First published on: 19-11-2014 at 03:25 IST