वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनीमधून बाहेर सोडले जाणारे काजळीमिश्रित पाणी वाहून 2vaikunth1जाण्यासाठी गटाराची व्यवस्थाच नसल्याने हे पाणी आजतागायत जमिनीतच मुरत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी गटार करावे ही कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत नसल्याने या परिसरात पाणी साचून डासांचे साम्राज्य झाले आहे.
ओंकारेश्वर येथील स्मशानभूमी ५ एप्रिल १९७१ रोजी नवी पेठ येथील १७ एकर परिसरात स्थलांतरित झाली. वैकुंठ स्मशानभूमी असे नामकरण करण्यात आलेल्या या स्मशानभूमीमध्ये सुरूवातीपासूनच दहनासाठी विद्युतदाहिनी उभारण्यात आली आहे. शहराच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे काही वर्षांनी आणखी एका विद्युतदाहिनीची भर पडली. आता या ठिकाणी तिसरी विद्युतदाहिनी उभारणीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन असून त्याला स्थायी समितीनेही मान्यता दिलेली आहे. मात्र, विद्युतदाहिनीतून बाहेर सोडले जाणारे काजळीमिश्रित पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आलेली नाही. हे पाणी वाहून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था करावी या मागणीला ठेंगा दाखविला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हे काजळीमिश्रित पाणी जमिनीमध्येच मुरत असून या परिसरामध्ये डासांचे साम्राज्यदेखील झाले आहे. हे पाणी एकत्रित संकलित करून वैकुंठ स्मशानभूमीतील झाडांना देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तरी या पाण्याचे करायचे काय हा प्रश्न निकालात निघू शकेल.
विद्युतदाहिनीमध्ये पार्थिवाचे दहन झाल्यानंतर धूर चिमणीवाटे बाहेर सोडला जातो. त्याला स्क्रबर लावून पाण्याची फवारणी करून हा धूर गाळला जातो. त्यामुळे चिमणीवाटे सोडल्या जाणाऱ्या धुराला काजळी नसते. फवारून बाहेर सोडले जाणारे हे पाणी काहीअंशी काजळीमिश्रित असते. त्या पाण्यामध्ये काही प्रमाणात राखदेखील असते. हे पाणी शुद्ध नसले तरी त्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. हे पाणी वाहून नेणारी गटारेदखील नाहीत. त्यामुळे हे पाणी जमिनीमध्ये मुरते. त्याचबरोबरीने हे पाणी काही प्रमाणामध्ये साचून राहिल्याने या भागात डासांचे साम्राज्य झाले आहे. विद्युतदाहिनीला स्क्रबर लावून धुराची गाळणी करण्यासाठी पाण्याचा प्रवाह अखंडित सुरू असल्याने प्रत्येक पार्थिवाचे दहन झाल्यानंतर बाहेर सोडलय़ा जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही अधिक आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा खंडित होतो त्या दिवशी धुराची गाळणी करण्यासाठी दीड हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, यातील एक टाकी नादुरुस्त झाल्याने आता हे काम एकाच टाकीद्वारे केले जात आहे, अशी माहिती सूत्राने दिली.