scorecardresearch

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. नितीन करमाळकर

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मेला संपुष्टात आला होता.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. नितीन करमाळकर
प्रा. नितीन करमाळकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बुधवारी प्रा. नितीन करमाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये करमाळकर यांच्या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. करमाळकर हे सध्या पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. गुरुवारी ते कार्यभार स्वीकारणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मेला संपुष्टात आला होता. त्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे पुण्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले होते. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून या पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी प्रा. करमाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. करमाळकर गेल्या २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली शोध-समितीची स्थापना करण्यात आली होती. या पदासाठी देशभरातून ९० अर्ज आले होते. त्यापैकी जवळपास ३० उमेदवार हे विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयांतील होते. त्यामध्ये विद्यापीठाचे सध्याचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विभागप्रमुख, आंतरराष्ट्रीय केंद्राचे माजी संचालक, माजी अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी अर्ज केले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-05-2017 at 14:54 IST

संबंधित बातम्या