सम्यक समाज परिवर्तनाचे शिलेदार, प्रकाशक आणि विचारवंत प्रा. विलास वाघ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुक्रवारी (२ ऑगस्ट) इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्चचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते प्रा. विलास वाघ आणि उषाताई वाघ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘प्रबोधन पर्व’ या विलास वाघ गौरव ग्रंथाचे प्रकाशन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस आणि धर्मराज निमसरकर यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती प्रा. विलास वाघ अमृतमहोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रा. विलास वाघ यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा ‘प्रबोधन पर्व’ हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे.