सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) च्या शाळांमध्ये नववीच्या वर्गापासूनच नियमित विषयांबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला असून या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना हे विषय घेता येणार आहेत.
सीबीएसईच्या देशभरातील शाळांमध्ये नववीच्या वर्गापासूनच व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. नॅशनल व्होकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कअंतर्गत ही नवी योजना सीबीएसईकडून राबवली जाणार आहे. सीबीएसई शाळांच्या नव्या अभ्यासक्रमानुसार व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी कौशल्य विकास करणाऱ्या देशभरातील विविध खासगी संस्थांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या संस्थांच्या सहकार्याने शाळांनी अभ्यासक्रम सुरू करावेत असे परिपत्रकही सीबीएसईने काढले आहे.
विक्री कौशल्य, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, बॅंकिंग अँड इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम, मास मिडीया, संगीत निर्मिती, आरोग्य आणि सौंदर्य, मेडिकल डायग्नोस्टिक, डिझाईन आणि सुरक्षा या विषयांचे व्यवसाय प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या विषयांपैकी एक किंवा दोन विषय शाळांनी उपलब्ध करून द्यावेत, असे सीबीएसईने त्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे. नियमित विषयांबरोबर वैकल्पिक विषय म्हणून व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या अभ्यासक्रमाचा पहिला स्तर नववीपासून सुरू होणार आहे.