घरासमोरच्या अंगणात गेरूने सारवून त्यावर काढलेली ठिपक्यांची सुबक रांगोळी आणि त्याच्या कडेने मांडलेल्या पणत्या दिवाळीची शोभा द्विगुणित करायच्या. अंगणे गेली, फ्लॅट संस्कृती आली तरीही दोन बिऱ्हाडांच्या दारांच्या मधल्या मोकळ्या जागेत रांगोळी सजत राहिली. गेल्या आठ-दहा वर्षांत मात्र दिवाळीतल्या रांगोळीची मिती बदलली आहे. घरगुती रांगोळी ते खास रांगोळीतल्या ‘प्रोफेशनल्स’ना बोलावून त्यांच्याकडून काढून घेतलेली रांगोळी असा या रांगोळीचा प्रवास आहे. केवळ व्यापारी मंडळीच नव्हे तर सोसायटय़ाही मोठय़ा प्रमाणावर अशी रांगोळी काढून घेत आहेत.
पुण्यात व्यावसायिक रांगोळीचे प्रशिक्षण देणारे विविध वर्ग आहेत. या वर्गामधून तयार होणाऱ्या रंगावलीकारांना गणेशोत्सव  विसर्जन मिरवणुकीत रांगोळ्या काढण्यासाठी मोठी मागणी असते. या माध्यमातून रंगावलीकार लोकांपर्यंत पोहोचतात आणि पुढे सणावारांना खास रांगोळी काढण्यासाठी त्यांना बोलावणी येऊ लागतात. गेल्या ८ ते १० वर्षांत सणावारांना काढल्या जाणाऱ्या रांगोळीत फरक पडल्याचे निरीक्षण राष्ट्रीय कला अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर यांनी नोंदवले. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत   व्यापाऱ्यांकडून विशेष करून लक्ष्मीपूजनाला तसेच पाडव्याच्या दिवशीच्या दुकानांच्या उद्घाटनांना रांगोळी काढून घेण्यासाठी रंगावलीकारांना बोलावले जाणे वाढले आहे. वसूबारस आणि पाडवा हे दिवस सोसायटय़ांमध्येही एकत्र साजरे केले जात असून बंगले आणि सोसायटय़ांमध्ये या दिवशी रंगावलीकारांकडून खास रांगोळी काढून घेतली जात आहे. लक्ष्मीपूजनाला तर रंगावलीकारांना पुण्यात इतकी मागणी असते की, पुण्याच्या बाहेरून येणारी आमंत्रणे स्वीकारणे त्यांना शक्य होत नाही. व्यावसायिक रंगावलीकारांना रांगोळीचा आर्थिक मोबदला मिळत असून पुण्यात रांगोळीवर उपजीविका असणारेही २० ते २५ रंगावलीकार आहेत.’
खास रांगोळ्या काढून घेताना नागरिक पारंपरिक शुभचिन्हांना अधिक पसंती देत आहेत. रांगोळीच्या मधोमध देवी, खंडोबा किंवा बालाजीचे रेखाटन आणि बाजूने दिवाळीच्या सणातील संदर्भ घेऊन काढलेल्या रांगोळ्या लोकप्रिय आहेत. दुकाने आणि सोसायटय़ांसमोर ५ बाय ८ फूट या आकारातील रांगोळ्यांना प्राधान्य दिले जात आहे. काही चौकांमध्ये मोठय़ा रांगोळ्याही काढून घेतल्या जात असून १० बाय ४० फूट अशा मोठय़ा रांगोळ्याही मंडळांकडून काढून घेतल्या जात असल्याचे व्यावसायिक रंगावलीकारांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professional rangoli
First published on: 12-11-2015 at 03:30 IST