पिंपरी : शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पिंपरीत ठाकरे गटाने बुधवारी रात्री नऊ वाजता रस्ता रोको केला. अर्धा तास रस्ता बंद केला होता.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी  ठिय्या मांडत रास्ता रोको केला.  त्यावरून पोलीस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली.  पिंपरीत झालेल्या आंदोलनात मावळचे संघटक संजोग वाघेरे, शहरप्रमुख सचिन भोसले,  महिला आघाडीच्या अनिता तुतारे,  माजी नगरसेविका मीनल यादव, अनंत को-हाळे, रोमी संधू आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>पिंपरीत ठाकरे गट आक्रमक, नार्वेकरांना श्वानाची उपमा; पोलीस अन् शिवसैनिकांमध्ये झटापट

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तानाशाही, दादागिरी नही चलेगी, ५० खोके एकदम ओके,  भारतीय राज्य घटनेची पायमल्ली करणाऱ्या अध्यक्षांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.

संजोग वाघेरे म्हणाले की, कायद्याची पायमल्ली करून निकाल दिला आहे. अतिशय निंदनीय निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हद्दपार करायचे आहे. त्यासाठी एकत्रित येऊन लढा उभारायचा आहे. या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल. केंद्र, राज्यातील सरकार झोपेचे सोंग करत आहे. त्यांचे हे सोंग उतारावयाचे आहे. शहरप्रमुख भोसले म्हणाले की, अध्यक्ष नार्वेकर यांनी घटनेची पायमल्ली केली आहे. लोकशाहीचा खून केला आहे. सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली निर्णय दिला आहे.