‘‘देशातील भ्रष्टाचाराला राजकारण्यांइतकीच जनताही जबाबदार असते; कारण जनतेने निवडून दिलेले लोकच लोकशाही व्यवस्थेचा भाग असतात. त्यामुळे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने बजावायला हवा,’’ असे मत राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केले.

‘माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’तर्फे युनेस्को अध्यासन व विश्वशांती केंद्राच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अ‍ॅड. उज्ज्वल निकम, सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर, उद्योजक प्रमोद चौधरी, आमदार कपिल पाटील, पत्रकार देवकिसन सारडा यांना शनिवारी हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष डॉ. कोडेला शिवप्रसाद राव, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष राहुल कराड या वेळी उपस्थित होते.

रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, ‘‘सामान्यांच्या वेदना समजून घेणारे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी गरजेचे आहेत. आर्थिक विषमता, जातीयता, विचारभिन्नता असली तरी भारतीय लोकशाही अजून टिकून आहे. त्यामुळे विकासासाठी सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तींनी राजकारणात यायला हवे.’’

प्रशासनात काम करताना तत्त्वे पाळणे महत्त्वाचे असते, असे सांगून करीर म्हणाले, ‘‘समाजपरिवर्तनासाठी दुवा म्हणून काम करणे ही प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी असते. कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता व निप:क्षपातीपणे काम करायला हवे. व्यवस्था बदलायची असेल व सामान्यांना सुलभ आयुष्य जगण्याची संधी मिळवून द्यायची असेल, तर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्यात लोकसहभाग असेल तर अधिक गतीने काम होते.’’

‘‘सत्याचा विजय व्हायचा असेल, तर काही वेळा असत्याची मदत घ्यावी लागते. वकिली व्यवसायात अनेकदा सत्य बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग झाला. गुन्हेगारांना शिक्षा होऊन सामान्यांना न्याय मिळाल्याचा आनंद आहे,’’ असे निकम यांनी सांगितले.