एकाच कुटुंबातील चार लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन असा दुर्मीळ योग पुणेकरांना गुरुवारी (२१ जुलै) अनुभवता येणार आहे. लोकासहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक-लेखक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डॉ. ढेरे यांच्यासह ढेरे कुटुंबातील सदस्यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.

डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राने हा योग जुळवून आणला आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निवडक प्रस्तावनांचा समावेश असलेल्या ‘शोधन आणि चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ढेरे यांची कन्या, प्रसिद्ध कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘प्रेमातून प्रेमाकडे‘ या पुस्तकाच्या विनया बापट यांनी केलेल्या ‘ट्रान्सेंडिग लव्ह’ या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे यांच्या ‘दृश्यभान’ या पुस्तकाचा शेफाली वैद्य यांनी केलेला इंग्रजी अनुवाद तसेच प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या पाच पुस्तकांच्या संचाचेही प्रकाशन होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आनंदयात्री बाकीबाब’-

प्रकाशन सोहळ्याच्या उत्तरार्धात ‘आनंदयात्री बाकीबाब’ हा ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ लेखिका वीणा देव, अभिनेते प्रमोद पवार आणि अभिनेत्री-निवेदिका समीरा गुजर हे बोरकर यांच्या कवितांचे अभिवाचन करणार असून निशा पारसनीस कवितांचे गायन करणार आहेत. ८ जुलै हा बोरकर यांचा स्मृतिदन असल्याने त्यांच्या काव्यसृष्टीला उजाळा देण्यासाठी ‘आनंदयात्री बाकीबाब’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.