आमच्या नाटक कंपनीच्या दौऱ्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर केंद्रिबदूच असायचे. त्या दौऱ्याला खानदानी थाट असायचा. ‘नाटकवाले आले’ म्हणून काही गावकऱ्यांना आमचे कौतुक तर, काही टिंगलही करीत. परंतु, आमच्या गाडीतून दाभोलकर उतरले की काही तरी विचार घेऊन नाटक कंपनी आली हे गृहीत धरले जायचे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मैत्र लाभणे हे आमच्यासाठी भाग्याचे होते.. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी मित्रवर्य डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागविल्या खऱ्या. पण, बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहवासातील स्मृती जागविणाऱ्या कवितांचा समावेश असलेल्या ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांच्या ‘हे मित्रवर्या’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. साधना ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमास डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील उपस्थित होते. दाभोलकर यांच्या हत्येला रविवारी (२० एप्रिल) आठ महिने पूर्ण होत आहेत. तरीही मारेकरी आणि सूत्रधार अद्याप सापडलेले नाहीत, अशी खंत सर्वानीच व्यक्त केली.
काय बोलावे हा प्रश्न पडला असून मी भांबावून गेलो आहे. खास मित्र आपल्यात नाही याची जाणीव आहे. तो केवळ माझ्या एकटय़ाचा नव्हे तर आपल्या सर्वाचाच जवळचा मित्र होता. दौऱ्यामध्ये दाभोलकर आमच्याबरोबर असायचे तेव्हा समाजावर मोठा परिणाम पडायचा, असे सांगून डॉ. श्रीराम लागू म्हणाले, माणूस अनेक दृष्टिकोनातून समजून घेता येतो. डॉ. दाभोलकर हे मला न सुटलेले कोडे आहे. माणसामध्ये एक गूढरम्य रहस्य दडलेले असते. तसेच दाभोलकर हे एक सनातन रहस्य आहे. तुम्ही त्यांचा जितका विचार कराल तितके अधिकाधिक सत्य तुम्हाला उलगडत जाईल.
दाभोलकर यांची हत्या झालेल्या पुलावर सरकारने त्यांचे स्मृतिस्थान करावे, असी भावना प्रा. रा. ग. जाधव यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publication of prof r g jadhavs hey mitrawarya
First published on: 20-04-2014 at 03:23 IST