‘शिवछत्रपतींचा वारसा- स्वराज्य ते साम्राज्य (१६०० ते १८१८) या डॉ. केदार फाळके लिखित पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (२७ जून) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.

पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे सायंका‌ळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमास भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथील श्री शिवाजी मेमोरियल कमिटीचे कार्याध्यक्ष सुब्बा रेड्डी, सचिव जी. रघुरामय्या, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री शिवाजी मेमोरियल कमिटीचे उपाध्यक्ष उदय खर्डेकर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, सदस्य श्रीनिवास कुलकर्णी यांनी शनिवारी दिली.

या कार्यक्रमात मराठी पुस्तकाबरोबरच ’द लेगसी ऑफ छत्रपती शिवाजी – किंगडम टू एम्पायर १६००-१८१८ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित होणार आहे. वाचकांना मराठेशाहीचा इतिहास एकाच ग्रंथात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून या ग्रंथाची निर्मिती केली आहे.