२५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गँगस्टरला..
पिंपरी- चिंचवड : पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मालमत्ता विरोधी पथकाने सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारेला अटक केली आहे. पिंपरीतील व्यवसायिकाची सोनसाखळी हिसकावताना पायावर गोळी झाडली होती. यानंतर घारे फरार झाला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली होती.
सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे हा गँगस्टर रवी पुजारी, सुरेश पुजारी यांच्याशी संबंधित आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला पैशांची चणचण भासत असल्याने त्याने पिंपरीतील व्यावसायिकाला हेरून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकाने प्रतिकार केल्याने घारेने त्याच्या पायावर गोळी झाडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकरणामुळे पिंपरीत एकच खळबळ उडाली.
गुन्हेगार रवींद्रने हेल्मेट आणि रेनकोट घातला असल्याने तपासात अनेक अडचणी आल्या. अखेर मालमत्ता विरोधी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन घारेला बेड्या ठोकल्या आहेत. रवींद्र घारे याच्यावर २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक हत्या आणि सहा गोळीबार त्याने केलेले आहेत. सध्या तो नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायकावरील गोळीबारप्रकरणी आणि मोक्का अंतर्गत फरार होता.
आरोपीकडून १ पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी सांगितली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या निदर्शनात करण्यात आली आहे.