पुणे महानगरपालिकेतर्फे शहरात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ठरवलेल्या उद्दिष्टापैकी ८७ टक्के बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. ज्या बालकांना पोलिओ डोस द्यायचा राहिला आहे त्यांच्यासाठी पुढचे पाच दिवस शहरात घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहेत. यासाठी १६५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात १३५० पोलिओ बूथ उभारून बालकांना डोस देण्यात आला. यात ४००० स्वयंसेवक, २७० पर्यवेक्षक आणि पालिकेच्या १६० डॉक्टरांनी काम केले. तसेच खासगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि काही स्वयंसेवी संस्थांनीही पालिकेस साहाय्य केले. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील ३ लाख २५ हजार बालकांना डोस देणे अपेक्षित होते. यांपैकी २ लाख ८३ हजार बालकांना डोस दिला गेला. एस.टी. स्थानक, रेल्वे स्थानक, बांधकामाची ठिकाणे, महामार्ग आणि काही उद्यानांमध्येही विशेष बूथ कार्यरत होते.
पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार असून त्यासंबंधीची माहिती http://www.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २३ फेब्रुवारी आणि त्यापुढील ५ दिवस पोलिओ मोहिमेचे दुसरे पर्व राबवण्यात येणार आहे.