पुणे : दारूच्या नशेत खडकवासला मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. तो मद्य प्यायला होता. घरात घुसण्याच्या प्रयत्नात असताना येथील सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर त्याने गोंधळ घातला.
शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव तापकीर यांचे धनकवडी परिसरात घर आहे. दारूच्या नशेत असलेला शंकर धुमाळ हा बुधवारी तापकीर यांच्या घराजवळ आला. घरात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या धुमाळ याला सुरक्षा कर्मचारी अजित देवघरे यांनी अडविले. पण, त्याने गोंधळ घातला. तसेच, सरकारी कामात अडथळा निर्माण केला. वारंवार तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत त्याने तीन वेळा घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी त्याने दिली. सतत होणाऱ्या या प्रकारामुळे आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे शेवटी सहकारनगर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
या प्रकरणात सुरुवातीला आरोपीवर किरकोळ कारवाई केली होती. मात्र, पुन्हा येऊन शिवीगाळ करत धुमाळ धमक्या देत होता. त्यामुळे तापकीर यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली. पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार, उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याप्रकरणी कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत धुमाळला अटक केली.