राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर आहेत. या ठिकाणी दररोज करोना रुग्णांबरोबरच करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे शहरात तर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोनची संख्या वाढवली आहे. दरम्यान, शहरातील रेड लाईट एरियातील एका सेक्स वर्कर महिलेने करोना संसर्गाच्या भीतीमुळे प्रसुतीसाठी रुग्णालयात न जात राहत्या घरातच बाळाला जन्म दिला असल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील अनेक रुग्णालयात करोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. अशावेळी मी जर प्रसुतीसाठी एखाद्या रूग्णालयात दाखल झाले तर, मला आणि माझ्या बाळाला देखील करोना विषाणूचा संसर्ग होईल. या भीतीपोटी मी रूग्णालयात न जाता घरीच बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील एका सेक्स वर्कर महिलेने सांगितले आहे.
या घटनेबाबत संबधित महिलेसोबत लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, करोना विषाणूचा पहिला रुग्ण आपल्या शहरात आढळल्यापासून माझ्यासह इतर महिलांच्या मनात एक भीती होती. आता आपलं कस होणार? त्यांच्या पेक्षा माझं आणि बाळाचा आता कसं होणार ही मला जास्त भीती होती? गरोदर महिला व इतर आजार असणार्या व्यक्तींना या आजाराचा अधिक धोका असल्याची माहिती समोर आली होती. तसेच आमच्या या भागात वेगवेगळया भागातून ग्राहक येत असतात. त्यामुळे आम्हाला धोका असण्याची अधिक शक्यता होती. शिवाय, या भागातून शहरात करोना विषाणूचा अधिक प्रमाणात फैलाव होऊ शकतो, असे ही बोलले जात होते. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसानी हा परिसर चारही बाजुंनी पत्रे लावून सील केला. परिणामी आम्हाला बाहेर पडणे, अशक्य होते. त्यात माझी डिलिव्हरीची तारीख देखील जवळ आली होती. १९ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मला त्रास होऊ लागला. त्यावेळी माझ्या सोबत इतर महिला देखील होत्या. आपण रूग्णालयात जाऊ या असे सर्वांनी सांगितले.
आणखी वाचा- Coronavirus : पुण्यातील रेड लाईट एरियातील एक हजाराहून अधिक महिला गावी परतल्या
शहरातील अनेक रुग्णालयात करोना रुग्णांनावर उपचार सुरू असल्याची माहिती मला होती. अशावेळी एखाद्या रूग्णालयात मला दाखल केल्यास, मला आणि माझ्या बाळाला देखील हा आजार होऊ शकतो. ही भीती माझ्या मनात आली. म्हणून मी माझ्या सोबत राहणार्या महिलांना मला रूग्णालयात नेऊ नका असे सांगितले. त्यावर सर्व महिलांनी मला धीर देत राहत्या घरातच माझी डिलेव्हरी केली. मला मुलगा झाला असून त्याची तब्येत ठणठणीत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही सर्व घटना सांगत असताना, त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
या रेड लाईट एरियामध्ये आजही अनेक महिला विविध आजारांमुळे त्रस्त आहेत. जर मी बाहेर पडले, तर मला देखील करोना विषाणूची लागण होऊ शकते. या भीतीपोटी येथील महिला रूग्णालयात उपचारासाठी बाहेर जात नाही. त्यामुळे प्रशासनाने या भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष पावले उचलण्याची गरज आहे.