पुणे : चांदणी चौकातून बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतारामुळे निर्माण होणारे अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या रस्त्यावर असलेल्या तीव्र उतारामुळे या परिसरात अनेकदा अपघातांचे प्रकार घडल्याने सुरक्षिततेसाठी हा उतार कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी हे काम तातडीने केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

जांभूळवाडी ते नवले पूल या दरम्यानच्या रस्त्यावर चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा बळी गेला. नवले पूल परिसरात असलेल्या तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे नियंत्रण सुटते आणि अपघात होत असल्याचे समोर आले आहे. कोथरूड येथील चांदणी चौकातून बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात उतार आहे. यामुळे अनेक अपघातांच्या दुर्घटना या परिसरात घडल्या आहेत. 

या रस्त्याचा उतार कमी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या कामामुळे या परिसरात होणारी वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, उपअभियंता सुनील भोंगळे यांनी नुकतीच चांदणी चौक आणि बावधन परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये बावधन खुर्द येथील गल्ली क्रमांक एक, सर्व्हे क्रमांक २० मधील तीव्र उतार असलेल्या रस्त्याची तपासणी करण्यात आली.

संबंधित रस्ता योग्य तांत्रिक पातळीवर विकसित करून त्याचा उतार कमी केल्यास येथील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांना आळा बसणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी प्रशासनाला दिले.

या पाहणीमध्ये महापाालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याला जोडल्या जाणाऱ्या अन्य रस्त्यांचीही पाहणी केली. हा रस्ता अधिक रुंद व्हावा, यासाठी उर्वरित जागांचा ताबा खासगी जागामालकांकडून घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

हा रस्ता विकसित झाल्यानंतर बावधन परिसरातून थेट महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी नवा लिंक रोड तयार होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे. महापालिकेने केलेल्या या नियोजनामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा पुणे महापालिकेने केला आहे.

अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, बावधन परिसरातील तीव्र उतार असलेल्या रस्त्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. हा रस्ता पूर्णपणे रुंद करून त्याचा उतार कमी करून समतोल केला जाणार आहे. यामुळे अपघातांना आळा बसेल.