पिंपरी- चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला. दोन आठवड्यापूर्वीच अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला होता. त्यादरम्यान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या होत्या. त्याची काही प्रमाणात पूर्तता झाली आहे का? अधिकारी तत्परतेने काम करत आहेत का? यासाठी आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी हिंजवडीचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलंच सुनावलं.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीसह पाणी तुंबण्याचं प्रमाण वाढलं होतं. मान्सूनच्या आगमनानंतर हिंजवडी आयटी पार्क वॉटर पार्कमध्ये बदलून गेलं होतं. यावरून चांगलंच राजकारण तापलं. आजदेखील अजित पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विविध ठिकाणी पाहणी केली. हिंजवडीच्या क्रोमा चौकातून दौऱ्याला सुरुवात झाली. ठीक सहा वाजता अजित पवार हे हिंजवडीत दाखल झाले. दौऱ्यादरम्यान हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना अजित पवारांनी चांगलच सुनावलं.
आपलं वाटोळ झालं आहे
जांभुळकर हे मंदिर न पाडण्यासाठी आग्रह करत होते. यावर अजित पवारांनी जांभुळकर यांना धारेवर धरलं. “धरण बांधताना मंदिर जातातच, तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचं ते करतो. आपलं वाटोळ झालं. हिंजवडीचं सगळं आयटी पार्क पुण्यातून बाहेर जात आहे. तुम्हाला काही पडलेलं नाही. कशाला इथं सकाळी सहाला आलो आहे. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.” असं म्हणत अजित पवारांनी जांभुळकर यांना खडसावलं.