पुणे : तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घालून ‘बॉयकॉट तुर्की’ या मोहिमेमध्ये सहभाग घेणाऱ्या पुण्यातील सफरचंदाच्या व्यापाऱ्याला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याने सह पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज दिला असून पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे तुर्कीबरोबरील व्यापार सरकारने थांबविण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून तुर्कीतून येणाऱ्या सफरचंदाची आयातही थांबविण्यात आली.

पुण्यातील सफरचंदाच्या व्यापाऱ्याने तुर्की सफरचंद विक्री न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इतर व्यापाऱ्यांना तसेच समाज माध्यमातून अशा स्वरूपाचे आवाहन केले. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन पाच ते सहा वेळा व्हॉटसॲप दूरध्वनी आला. त्यांनी व्हॉटस ॲप पाहिले तेव्हा काही व्हाईस नोटस पाठविण्यात आल्याचे समजले. त्या उघडल्या असता त्यांना गलिच्छ भाषेत धमकी देण्यात आली होती. यामध्ये व्यापारी तसेच देशाला धमकावण्यात आले आहे. त्यावर व्यापाऱ्याने स्वत: एक व्हाईस मेसेज पाठवला. त्यामध्ये ‘माझ्या मागे १४० कोटी जनता आहे. तुला घाबरत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.