शहराच्या विकास आराखडय़ासाठी आवश्यक असलेल्या जमीन वापराच्या नकाशांबाबत महापालिका प्रशासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमुख यांची एकत्रित बैठक बोलावून उभयतांकडून लेखी खुलासे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
विकास आराखडा प्रसिद्ध करताना आराखडा ज्या हद्दीसाठी तयार केला जातो, त्या हद्दीतील विद्यमान जमीन वापराचे (एक्झिस्टिंग लँड यूज- ईएलयू) व भूमापनाचे नकाशे प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक आहे. महापालिकेने त्यासाठीचे सर्वेक्षण व नकाशे तयार करण्याचे काम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिले होते. प्रत्यक्षात हे नकाशे नागरिकांना समजणार नाहीत अशा स्वरुपात महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आले. या प्रकाराबाबत पुणे बचाव कृती समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जुलैमध्ये निवेदन दिले होते. नकाशांमध्ये अनेक त्रुटी आहेत तसेच त्यात अनेक गंभीर चुकाही हेतूपूर्वक करण्यात आल्या आहेत अशी समितीची तक्रार होती.
अजित पवार यांनी या तक्रारीबाबत महापालिकेकडून खुलासा मागवला होता. हा खुलासा महापालिकेने पवार यांच्याकडे लेखी स्वरुपात केला असून तो दिशाभूल करणारा असल्याचा आरोप समितीचे सुहास कुलकर्णी आणि उज्ज्वल केसकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ईएलयू प्रसिद्ध करताना महापालिकेने पुणेकरांची दिशाभूल केलीच, आता उपमुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल केली जात असल्याचे कुलकर्णी म्हणाले. आम्ही ज्या मुद्यांबाबत हरकतीच घेतलेल्या नव्हत्या त्यांचा खुलासा महापालिकेने केला आहे आणि ईएलयू चुकीचे आहेत हा आमचा मुख्य आक्षेप होता त्याला उत्तर देण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
सीओईपीने केलेल्या नकाशांच्या कामात असंख्य मूलभूत त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यांनी काम समाधानकारक व मुदतीत केलेले नाही. त्यामुळे हे काम महापालिकेने केले असे महापालिकेने पवार यांना कळवले आहे. त्यामुळे याबाबत महापालिका प्रशासन आणि सीओईपीचे प्रमुख यांची एकत्रित बैठक बोलावून लेखी खुलासे घ्यावेत व गोंधळ दूर करावा, या मागणीचे पत्र कुलकर्णी, केसकर, शिवा मंत्री, तसेच नगरसेवक प्रशांत बधे आणि संजय बालगुडे यांनी पवार यांना दिले आहे.