पुणे : पुणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  नियुक्ती करण्यात आल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ाचा कारभार पुन्हा अजित पवार यांच्या हाती आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेतील सत्ता भारतीय जनता पक्षाकडे आणि पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे राजकीय वादही रंगण्याची शक्यता आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदाची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे. सन २०१४ पूर्वीपर्यंत अजित पवार हे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदलली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानुसार अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी पुन्हा आली आहे. समान पाणीपुरवठा योजना, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना, वाढीव पाणीकोटा, वर्तुळाकार मार्ग, पीएमआरडीएशी संबंधित महत्त्वाकांक्षी प्रकल्प, प्रादेशिक नगररचना योजना, कासारसाई धरण प्रकल्पाचा कालवा रद्द करून हिंजवडीसाठीचा पर्यायी रस्ता, चासकमान धरणाचा कालवा भूमिगत करणे, टेमघर धरणाची उंची वाढविणे, खडकवासला धरण ते फुरसुंगी भूमिगत कालवा अशा कामांना गती देण्याचे आव्हान अजित पवार यांच्यापुढे राहणार आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे विरोधी पक्षांना बरोबर घेऊन अजित पवार कामे मार्गी लावणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.