पुणे : गेल्या ६५ वर्षांपासून पत्रलेखनाचा छंद जोपासत तब्बल एक लाख पोस्ट कार्ड पाठविणारे प्रा. सु. ह. जोशी यांचे छायाचित्र आता टपाल तिकिटावर दिसणार आहेत. टपाल विभागाच्या (पुणे सिटी पोस्ट) ‘माय स्टॅम्प’ या संकल्पनेनुसार प्रा. सु. ह.जोशी यांचे छायाचित्र तिकिट प्रदर्शित करून टपाल विभागाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पत्रलेखकाच्या प्रदीर्घ कामगिरीचा हा सन्मान करून टपाल विभागाने त्यांच्याविषयीची कृतज्ञताच व्यक्त केली आहे.
सिटी पोस्ट, सहकारनगर येथील एकता मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने प्रा. सु. ह. जोशी यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन त्यांच्या नवी पेठेतील निवासस्थानी करण्यात आले होते. वरिष्ठ पोस्टमास्तर विलास घुले, सुरेंद्र तापकीर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, कल्याणी सराफ, एकता मित्र मंडळाचे सुधीर ढमाले, शुभम बाणखेले, सुखकर्ता प्रतिष्ठानचे शेखर कोरडे यांच्यासह जोशी यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. पुणेरी पगडी, उपरणे, चाफ्याची फुले, मिठाई देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
घुले म्हणाले, ‘सध्याच्या मोबाइलच्या जमान्यातही जोशी यांनी पत्रलेखन करीत पोस्ट कार्ड पाठवून इतरांचे कौतुक करण्याची आवड जोपासली. टपाल कार्यालय हे माध्यम म्हणून निवडल्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्यावरील छायाचित्र तिकिट प्रदर्शित केले आहे.
जोशी म्हणाले, ‘पत्र पाठविल्यानंतर वेगळ्या प्रकारे समाधान मिळत असे. पोस्ट विभागाने अनेक वेळा मला सहकार्य केले आहे. चांगल्या कामाचे कौतुक करणे थोडे असतात. त्यामुळे पोस्ट कार्ड पाठवून अशांचे कौतुक करण्याचा मी प्रयत्न केला.’
मिळेल त्या वाहनाने, ट्रक बैलगाडीने सुद्धा हजारो किलोमीटरचा प्रवास स्वखर्चाने करून सामाजिक जाणिवेतून विना मानधन व्याख्याने देत प्रसिद्धीपरांगमुखता हा स्वभाव विशेष जोशी यांनी जपला आहे. देव, देश आणि धर्मावर अपार निष्ठा असलेल्या वयाच्या ८६ व्या वर्षापर्यंत जोशी सरांनी एक लाखाहून अधिक पोस्ट कार्ड पाठविली आहेत. १९५९ पासून त्यांनी हे काम सुरु केले. त्यावेळी अवघे पाच पैसे अशी कार्डची किंमत होती. दररोज किमान सात ते आठ पोस्ट कार्ड ते इतरांना पाठवत असत. त्यांच्या या कार्याचा पोस्ट खात्याने आणि गणेशोत्सव मंडळाने केलेला सन्मान हा अवर्णनीय आहे. आनंद सराफ, सामाजिक कार्यकर्ते