पुणे : इयत्ता पहिलीच्या मराठी, गणित आणि इंग्रजी विषयांच्या पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांची एकविसाव्या शतकासाठी आवश्यक असलेली जीवन कौशल्ये, भाषिक कौशल्ये, सामाजिक कौशल्ये वाढवण्यावर भर देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषा आणि मातृभाषेतून व्यक्त होता येणार आहे.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक कृष्णकुमार पाटील यांनी नव्या पाठ्यपुस्तकांबाबत माहिती दिली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित इयत्ता पहिलीसाठी नवी पाठ्यपुस्तके ‘बालभारती’ने तयार केली आहेत. २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून (१६ जून) सुरू होणार असून, पहिलीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे.

‘बालकेंद्रित दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सक्रिय आणि सहभागात्मक शिक्षणासाठीचा मजकूर आणि कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकविसाव्या शतकातील आवश्यक कौशल्यांचा विचार पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमीसह विद्यार्थ्यांचे वय, समज, आवडीनिवडी, अनुभव विचारात घेऊन विचार करणे, संवाद साधणे, विश्लेषण करणे अशा क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षाविषयक जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी, त्या परिस्थितीत घ्यायची काळजी याबाबतच्या माहितीचाही समावेश पुस्तकात करण्यात आला आहे,’ असे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले.

पाठ्यपुस्तकांत काय?

गणिताच्या पाठ्यपुस्तकात एक ते शंभर अंकांची ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकाराची तोंडओळख, लहान संख्या-मोठी संख्या, वर्गवारी, एक रुपयाच्या नाण्यापासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांची ओळख असे घटक, त्यासाठीच्या कृतींचा समावेश आहे. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात ए ते झेड अक्षरांशिवाय मनोरंजक कविता, पाठांचा समावेश आहे. त्या माध्यमातून पालेभाज्या, फळभाज्या, प्राणी, घरातील वस्तूंना काय म्हणतात, संवाद कसा साधायचा, दिवसभर काय करायचे, उठणे, बसणे, वळणे, हात वर करणे असे कृतियुक्त धडे इंग्रजीतून दिले जातील. विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तर, मराठीच्या पाठ्यपुस्तकात चौदाखडी, नातेवाइक, निसर्ग याबाबत ओळख करून देणाऱ्या कविता, कथा, गाणी, कृती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्यूआर कोडद्वारे दृक्-श्राव्य मजकूर

विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीमध्ये मागे पडत असल्यास त्याला कोणता सराव द्यावा, याबाबतची माहिती पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे. तसेच पाठ्यपुस्तकावर असलेल्या क्यूआर कोडमध्ये दृक्-श्राव्य मजकूर समाविष्ट करणे प्रस्तावित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.