महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी यंदा वास्तववादी अंदाजपत्रक तयार केल्यामुळे स्थायी समितीची चांगलीच कोंडी झाली आहे. प्रतिवर्षांप्रमाणे लोकप्रिय घोषणा करण्यासाठी अंदाजपत्रक कसे फुगवायचे असा प्रश्न स्थायी समितीपुढे उभा राहिला असून स्थायी समितीच्या फुगवटय़ाला आयुक्तांनी टाचणी लावल्याची परिस्थिती महापालिकेत दिसत आहे.
आयुक्तांनी त्यांचे तीन हजार ६०८ कोटींचे अंदाजपत्रक गेल्या आठवडय़ात स्थायी समितीकडे सुपूर्त केले. या अंदाजपत्रकात तीनशे ते चारशे कोटी रुपयांचा फुगवटा करून स्थायी समिती या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरुप देते व पुढे ते मुख्य सभेत मंजूर होते. ही दरवर्षांची प्रथा आहे. यंदा मात्र या प्रथेला आयुक्तांनी टाचणी लावली आहे. आयुक्तांचे अंदाजपत्रक गेल्या वर्षी तीन हजार ६०५ कोटींचे होते. त्यात आयुक्तांनी यंदा जेमतेम तीन कोटींची वाढ केली. गेल्यावर्षी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने विक्रमी ५६२ कोटी ५० लाख रुपयांची वाढ केली होती.
यंदा हा धोका लक्षात घेऊन आयुक्तांनीच जमा व खर्चाचा काटेकोर विचार करत वास्तववादी अंदाजपत्रक तयार केले आहे. ‘अंदाजपत्रक तयार करताना इच्छा व आकांक्षांपेक्षा उत्पन्नाचा विचार करायला हवा,’ या अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या विधानाचा दाखला देत आयुक्तांनी स्थायी समितीलाही यापुढे अंदाजपत्रक फुगवू नका असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. तसेच ते फुगवण्याचा प्रकार झाल्यास त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही, हे स्पष्टपणे सांगायलाही आयुक्त विसरलेले नाहीत. वर्षभरात महापालिकेची जमा तीन हजार कोटी एवढीच होऊ शकते, हेही आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले आहे. अशा अंदाजपत्रकामुळे स्थायी समितीची आता पंचाईत झाली आहे.
अंदाजपत्रकाला अंतिम स्वरुप देण्यासाठी समितीच्या बैठका सध्या रोज सुरू आहेत. समितीकडून अंदाजपत्रक किती फुगवले जाते ते लवकरच कळेल. स्थायी समितीमार्फत लोकप्रिय घोषणा करण्यासाठी, तसेच समिती सदस्यांच्या प्रभागांमधील नव्या प्रकल्पांसाठी, सत्ताधारी नगरसेवकांच्या योजनांसाठी, पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांसाठी अंदाजपत्रक फुगवले जाते. यंदाचे अंदाजपत्रकीय वर्ष हे निवडणूक वर्ष ठरणार असल्यामुळे अंदापत्रकातील घोषणांबाबत अधिकच चर्चा होणार आहे.