विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पुण्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसंच भाजपाच्या विजयसाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळं काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

पुण्याचे माजी महापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे यांच्यासह अनेकांनी कमळ हाती घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं स्वागत केलं. यावेळी खासदार संजयनाना काकडे, शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत काँग्रेसला आणखी एक धक्का दिला. तसंच पक्षप्रवेशानंतर त्यांनी कँटोन्मेंट मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता सुनील कांबळे यांचं पारडं जड झाल्याचं म्हटलं जात आहे.