पुण्यातील एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजमेंट प्रोफेश्नल असणाऱ्या उच्चशिक्षित महिलेला ६२ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. या महिलेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची पीडितेशी एका वधु-वर सूचक संकेतस्थळावरून (मॅट्रिमोनिअल साईटवर) ओळख झाली होती. या व्यक्तीने स्वत:ची ओळख करुन देताना आपण ब्रिटनमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतो असं सांगितलं होतं.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलेने वाकड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मॅट्रिमोनिअल साईटवर संबंधित आरोपी या महिलेच्या पहिल्यांदा संपर्कात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. काही दिवसानंतर या दोघांनी फोनवरुन गप्पा मारण्यास सुरुवात केली. आपण भारतात परतण्याचा विचार करत असल्याचं या व्यक्तीने संबंधित महिलेला सांगितलं. भारतात परतल्यानंतर आपण कायमचे भारतात राहणार असल्याचंही त्याने म्हटलं. इतकच नाही तर भारतात आल्यानंतर आपण लग्न करुयात असं आश्वासनही या व्यक्तीने महिलेला दिलं. महिलेनेही त्याच्याशी लग्न करण्यासाठी होकार दिला.

आपण भारतात येण्याआधी आपलं सामन पाठवणार आहोत असंही या व्यक्तीने महिलेला सांगितलं. हे सामन भारतामध्ये आणण्यासाठी या महिलेने सर्व खर्च केला. यामध्ये प्रोसेसिंग फी, कर, दंड आणि इतरही बरीच रक्कम महिलेने स्वत:च्या खात्यावरुन खर्च केली.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण : रेशीम बंध की फसवणुकीचा फास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित महिलेने केलेल्या दाव्यानुसार तीने १५ वेळा आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये ६२ लाख रुपये जमा केले. याच दरम्यान तिला आपली फसवणूक केली जात असल्याची शंका आली. त्यानंतर तिने पिंपरी-चिंचवड पोलीस स्थानकाला संपर्क करुन गुन्हा दाखल केला. तेव्हा हे खातं खोटं म्हणजेच बनावट असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरिक्षक संतोष पाटील यांनी दिलीय.