पुणे : घरफोडी करणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर भागातून अटक केली. त्याच्याकडून पिस्तुलासह सोन्याचे दागिने असा १८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात चोरट्याने घरफोडीचे तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

हंसराज सिंग उर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. टाक हा सराइत चोरटा आहे. त्याने घरफोडीचे गुन्हे केले असून, तो तुळजाभवानी वसाहतीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी कानिफनाथ कारखेले आणि नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाकला पकडले.

त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घरातून पिस्तूल, काडतुसांचे मोकळे मॅगझीन, काडतूस, १७ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा १८ लाख २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टाक याने सहकारनगर, पिंपरी-चिंचवडमधील चिखली, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळसाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर यांनी ही कामगिरी केली.

पिस्तूल बाळगणारे सराइत गजाआड

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ ही कारवाई करण्यात आली. सराइतांकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.

रवींद्र लक्ष्मण रसाळ (वय २१, रा. चिरमोडी, गुंजवणी, ता. वेल्हा, जि. पुणे) , अथर्व अभिमन्यू शेजवळ (वय २०, रा. शिवांश अपार्टमेंट, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रसाळ हा सराइत असून, तो साथीदारासह नदीपात्रातील वर्तक बागेजवळ थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे, मंगेश गुंड यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.

सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अमोल आवाड, मयूर भोकरे, मंगेश गुंड, दुर्योधन गुरव, बालारफी शेख, रहीम शेख यांनी ही कारवाई केली.