पुण्यातील कोंढवे धाडवे येथील एका पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला दुचाकीने धडक दिली. त्याचा जाब रिक्षाचालकाने विचारताच त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
संदीप मोहन सातव आणि स्वरूप संगपाल आवटे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास कोंढवे धाडवे येथील एका पेट्रोल पंपासमोर समीर घुमे यांच्या रिक्षाला संदीप मोहन सातव आणि स्वरूप संगपाल आवटे यांच्या दुचाकीने जोरात धडक दिली. याबद्दल समीर घुमे यांनी त्या दोघांना जाब विचारला असता संदीप सातव याने त्याच्या जवळील पिस्तूल समीर याच्यावर रोखली. त्यामुळे समीरने घाबरून तेथून पळ काढला आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगताच, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींपैकी संदीप सातव याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उत्तमनगर पोलिसांनी सांगितले.